
जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रमशिक्षक दिनी तालुक्यातील शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार
जळगाव जामोद : प्रतिनिधी
५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व सन्मान व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी इंगळे, विस्तार अधिकारी सुनील हागे व केंद्रप्रमुख महादेव कुवारे यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.यावेळी महिंद्र रोठे, हरिभाऊ पांडे, प्रमोद इंगळे, सुनील हिस्सल, अनिल भगत, अजिंक्य रिंढे, निलेश काळे,संतोष कराळे, प्रवीण मिरतकर, दीपक पसरटे, धम्मानंद डोंगरदिवे, हेमंत तवटे व निर्मळ सर, शिनगारे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.सत्कारामुळे शिक्षकांना अधिक जोमाने व उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना अनिल भगत, प्रमोद इंगळे व महिंद्र रोठे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी विस्तार अधिकारी सुनील हागे व गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख महादेव कुवारे, सूत्रसंचालन दीपक पसरटे, तर आभार प्रदर्शन प्रवीण मिरतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
