
रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जामोद, वडशींगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांची महावितरणकडे मागणी
प्रतिनिधी जळगाव जामोद,
दि. ४ सप्टेंबर जामोद, वडशींगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता, महावितरण जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, मागील ३० ते ३५ दिवसांपासून परिसरात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने पिकांना पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. यंदा अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आधीच आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत उरलेली पिके वाचविण्यासाठी सिंचन करणे अत्यावश्यक झाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा वीजपुरवठा सुरू होता. मात्र ऑगस्ट महिन्यापासून महावितरणने वेळापत्रक बदलून रात्री वीजपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत असून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पुरानंतर शेतात गवत, काटेरी झुडपे तसेच साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्री सिंचनासाठी जाणे शेतकऱ्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, सावरगाव, पिंपळगाव, आसलगाव आदी लगतच्या भागांमध्ये दिवसा वीजपुरवठा सुरू असताना जामोद परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी रात्रीचा वीजपुरवठा तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा परिसरातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील तसेच महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष महादेव भालतडक यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
