
नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून नांदेड–अकोला दरम्यान सर्वंकष पाहणी
प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर
प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी 01 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड ते अकोला दरम्यान रेल्वे पायाभूत सुविधा, परिचालन व्यवस्था तसेच सुरू असलेल्या विकासकामांची सर्वंकष पाहणी केली.विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी अकोला ते पूर्णा दरम्यान रिअर विंडो निरीक्षण करून या मार्गावरील रेल्वे पायाभूत सुविधांची स्थिती तसेच विविध परिचालन बाबींचा सविस्तर आढावा घेतला.पाहणी दरम्यान प्रदीप कामले यांनी पूर्णा, हिंगोली आणि वाशिम स्थानकांवरील अमृत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच बसमत, हिंगोली, वाशिम आणि शिवणी शिवापूर स्थानकांवरील सुरू असलेल्या गुड्स शेडच्या कामांची पाहणी करून कामांची प्रगती आणि गुणवत्ता यावर विशेष भर दिला.विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी अकोला येथील क्रू लॉबी आणि रनिंग रूमच्या सुविधांचीही पाहणी केली तसेच अकोला–अकोट विभागाशी संबंधित विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. त्यांनी अकोट रेल्वे स्थानकाची पाहणी करून तेथील प्रवासी सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामे वेळेत पूर्ण करणे, कामांमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता राखणे तसेच परिचालन कार्यक्षमता आणि प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.अकोला येथील भेटीदरम्यान श्री प्रदीप कामले, यांनी अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान अकोला परिसराशी संबंधित विविध रेल्वे विषयांवर चर्चा करण्यात आली.पाहणीदरम्यान अभियांत्रिकी, परिचालन, वाणिज्य, सिग्नल व दूरसंचार, विद्युत, टीआरएसओ, सुरक्षा, संरक्षा आणि गतिशक्ती विभागांचे वरिष्ठ अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत उपस्थित होते.ही पाहणी नांदेड विभागाची रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह रेल्वे परिचालन सुनिश्चित करण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे
