
उच्च न्यायालयाच्या लिपिक परीक्षेतील तांत्रिक गोंधळाचा फटका परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची तहसीलदारांकडे मागणी
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय अकोट येथे १९ ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले.राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली ही परीक्षा १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. अकोला शहरातील कापसी येथील परीक्षा केंद्रांवर अकोला तसेच आसपासच्या जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते.मात्र परीक्षा सुरू होताच काही विद्यार्थ्यांना संगणकांमध्ये गंभीर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.काही संगणकांच्या स्क्रीनवर वेगवेगळे रंग दिसत होते.तर स्क्रीनचा आकार वेगवेगळा असल्याने प्रश्न आणि त्यातील मजकूर व्यवस्थित दिसत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.त्याचबरोबर काही परीक्षा केंद्रांवर कीबोर्ड आणि माऊस व्यवस्थित काम करत नसल्याने प्रश्न सोडविताना अडथळे निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.परीक्षा सुरू असतानाच संबंधित केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही तातडीने योग्य मदत किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.या मागणीसाठी राजीव खारोडे,तन्वी खारोडे,समिया रेले,पल्लवी रेले,प्रणाली गडम,दृषाली छाडे,मयूरी भिसे,वैभव अस्वार,तेजल मगर,कोमल राखबळी,स्नेहा माहोरे,बुतन टिंगरे, सुष्मा बोदखे,शुभम मानकर आणि हिरकणी थोरात आदी विद्यार्थ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन निवेदनातील मागणी संबंधित उच्च अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवावी आणि या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.अशी विनंती तहसीलदारांकडे करण्यात आली आहे
