
जळगाव जामोद येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद तालुक्यातील सातळी फाटा परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन जणांसह अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तलाठी विनायक राजाराम रहाटे हे 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सातळी फाटा परिसरात शासकीय कर्तव्य बजावत असताना, आरोपींनी महसूल विभागाच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. यावेळी अंदाजे 2 ब्रास वाळू भरलेला, सुमारे 14 हजार रुपये किंमतीचा विनानंबर पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा टिप्पर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी घटनास्थळावरून पळवून नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी वैभव तेजराव हागे (रा. येरळी, ता. नांदुरा) व स्वप्नील विठ्ठल मानकर (रा. हिंगणा बाळापूर जुने, ता. जळगाव जामोद) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र गौण खनिज अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याची नोंद जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. अतुल मोहाळे करीत आहेत. अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारांवर प्रभावी कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
