
मलकापूरच्या सकल मराठा समाजाकडून नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेधतालुका दंडाधिकाऱ्यांना निवेदन; योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी सोशल मीडियावर मराठा समाजातील मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मलकापूर येथील सकल मराठा समाजाने निषेध केला आहे.वाघमारे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये मराठा समाजातील तरुणींबाबत आक्षेपार्ह स्वरूपाची वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. तसेच, काही मंत्र्यांच्या कुटुंबांमध्ये मराठा समाजातील मुलींबाबतही त्यांनी आक्षेपार्ह भाष्य केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वक्तव्यांमुळे मराठा समाजातील माता-भगिनींच्या भावना दुखावल्या असून, समाजात नाराजी निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मा. तालुका दंडाधिकारी, मलकापूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित वक्तव्यांची चौकशी करून, कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, भारतीय दंड संहितेतील संबंधित तरतुदी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “समाजातील कोणत्याही घटकाच्या माता-भगिनींबाबत अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नाही. अशा वक्तव्यांमुळे समाजातील सलोखा आणि शांतता बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.”प्रशासनाकडून सात दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा, लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.या निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा तसेच मा. पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, मलकापूर यांना पाठवण्यात आली आहे.यावेळी शंकर पाटील, संजय गावंडे, माधवराव गायकवाड, अश्विनीताई काकडे, सुभाष पाटील, आशिष वनारे, ॲड. सुवर्णाताई चोपडे, भागवत गावंडे, श्रीकृष्ण वनारे, कैलास पाटील, राजू मोरे, सुनील पाटील, पंकज डामरे, गजानन ढगे, प्रभाकर म्हैसागर आदी समाजबांधव उपस्थित होते.
