
श्रध्दा व परंपरेचे दर्शन घडवित ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर येथून कावड आणणार्या शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : श्रावण महिन्याचे पावित्र्य, भक्तीचा महापूर, ना कुठला गाजावाजा, ना डिजे ना धांगडधिंगा.. केवळ श्रध्दा व परंपरा जपत ओंकारेश्वर येथील नर्मदा मातेचे पवित्र जल घेवून मलकापूर येथे आगमन झालेल्या कावडधारी शिवभक्तांचे छत्रपती शिवाजीनगर वासियांनी मोठ्या उत्साहात डफडे, टिमकीच्या निनादात स्वागत केले. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ते मलकापूर या तब्बल २०० कि.मी. पायी चालून नर्मदेच्या पाण्याचे कावड घेवून आलेल्या शिवभक्तांनी छत्रपती शिवाजीनगर येथील नदीतील शिव पिंड, व नगरात असलेल्या शंकाराच्या मंदिरातील शिव पिंडावर नर्मदेच्या पाण्याचा अभिषेक करून बम् .. बम् .. भोलेचा जयघोष केला.छत्रपती शिवाजीनगर येथील शिवभक्त, जयभवानी मंदीर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून ओंकारेश्वर ते मलकापूर कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही १२ ऑगस्ट रोजी 13 शिवभक्त ओंकारेश्वरसाठी रवाना झाले होते. तर १३ ऑगस्ट रोजी ओेंकारेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेवून नर्मदेचे जल कावडमध्ये घेत ते मलकापूरसाठी रवाना झाले. या कावड यात्रेत गजानन चव्हाण यांच्यासह गजानन घण, अनिल सुर्यवंशी, भानुदास सुर्यवंशी, सुनिल सुर्यवंशी, मंगेश आमराळे, दिपक आरडे, अमोल काळे, गजराज साळुंके, निखिल पोंदे, लवकेश वानखेडे, जय कागदे, स्वरूप गवई या शिवभक्तांनी ओंकारेश्वर त मलकापूर कावड आणली. या दरम्यान त्यांनी मध्यप्रदेश येथील दवडा येथे १३ ऑगस्ट रोजी, कुमटी येथे १४ ऑगस्ट रोजी तर निंबोळा येथे १५ ऑगस्ट रोजी मुक्काम केला. तर १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सुकळी येथे मुक्काम करून १७ ऑगस्ट रोजी पवित्र श्रावण सोमवारी हे कावडधारी छत्रपती शिवाजीनगर येथे दाखल झाले.शहराच्या वेशेत येताच भारत काट्यावर छत्रपती शिवाजी नगरचे नगरसेवक दुर्गेश राजापुरे व सहकार्यांनी तर नगरात माजी आमदार वसंतराव शिंदे, राकाँ शहराध्यक्ष राजाभाऊ डोफे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तर भारत काट्यापासूनच ठिकठिकाणी माता-भगिणींनी या कावडधार्यांचे औक्षण करीत त्यांचे पाय धुवून त्यांचे स्वागत केले. पंतनगरसह छत्रपती शिवाजी नगर येथे मोठ्या संख्येने शिवभक्त या कावडधार्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
