
बंधाऱ्याच्या दुरुस्तीअभावी महापुराचे पाणी शेतात; शेतकऱ्याचे १०० टक्के नुकसान!नुकसानभरपाई न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद : येनगाव शिवारातील गट क्रमांक ८६ मधील शेतकऱ्याच्या शेतीला ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुराचा मोठा फटका बसला. नदीकाठालगत असलेल्या शेताच्या बाजूचा बंधारा फुटल्याने पुराचे पाणी थेट शेतात शिरले. बंधाऱ्याची दुरुस्ती व संबंधित काम वेळेत न झाल्यामुळे शेतीचे

मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी देवमन मरी दाभाडे यांनी निवेदनातून केला आहे.पुराच्या पाण्यामुळे शेतातील केळी व संत्रा पिकांसह स्प्रिंकलर, पाइप, दोन विहिरी तसेच मोटारपंपाचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोटारपंप गाळामध्ये फसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.बंधाऱ्याच्या कामाबाबत संबंधितांना वेळोवेळी तोंडी तसेच निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र, आपल्या शेताच्या बाजूने आवश्यक काम करण्यात आले नसल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे. त्यामुळे महापुराचे पाणी शेतात शिरून शेतीचे १०० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असून, शेतीसाठी तसेच कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठीही कर्ज घेतल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे कुटुंबासमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असल्याचे

त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नाही तर स्वतःसह कुटुंब आमरण उपोषणास बसणार, असा इशारा देवमन दाभाडे यांनी निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.प्रशासन या शेतकऱ्याच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करणार का आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
