वाडी खुर्दच्या समस्या ऐरणीवर; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप

वाडी खुर्दच्या समस्या ऐरणीवर; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप पावसाचे पाणी घरात शिरून नुकसान; रस्ते, पूल व नाल्यांची दुरवस्था — १४ ऑगस्टपासून उपोषणा सुरू


जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाडी खुर्द वस्तीतील विविध मूलभूत समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाडी खुर्द परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने घरातील साहित्याचे नुकसान होऊन नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
वाडी खुर्द गावामध्ये आदिवासी वस्ती असून, या समाजासाठी उभारण्यात आलेला पूल अद्याप पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेला नाही. पावसाच्या पाण्यामुळे पुलाची परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गावाकडे जाणारे रस्ते नादुरुस्त असून, सर्व घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांनी घरदार व ग्रामपंचायतीला यापूर्वी लेखी निवेदने देऊनही अपेक्षित स्वरूपाची कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. परिसरातील नाल्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
तसेच, भाऊ पाटील यांच्या घराजवळील विद्युत डीपी पुराच्या पाण्यामुळे धोकादायक स्थितीत येत असल्याने विजेचा शॉक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जळगाव-जामोद–नांदुरा मार्गावरील सिमेंट रोड परिसरात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने रस्त्यावर पाणी साचत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व समस्यांवर संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतीने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पूल, नाल्या व पाणी निचरा व्यवस्थेची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोषी कंत्राटदार अथवा संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थ व शेतकरी १४ ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे वाडी खुर्द परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *