ज्येष्ठ किराणा व्यापारी बद्रीनारायण जगन्नाथ लटूरिया यांचे निधन;माहेश्वरी समाज, व्यापारी व नागरिकांनी दिला निरोपवाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ किराणा व्यापारी तथा माहेश्वरी समाजातील वयोवृद्ध व्यक्तिमत्त्व बद्रीनारायण जगन्नाथ लटूरिया (वय ९४) यांचे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मालेगाव शहरातील व्यापारी क्षेत्रासह माहेश्वरी समाजावर शोककळा पसरली आहे. लटूरिया यांनी अनेक वर्षांपासून किराणा व्यवसाय करत व्यापारी क्षेत्रात विश्वासार्ह आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. साधी राहणी, मनमिळावू स्वभाव, समाजाभिमुख वृत्ती आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते व्यापारी वर्गासह सर्व समाजघटकांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन मुले, नातू, मोठा आप्त परिवार आहे . मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर स्थानिक हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माहेश्वरी समाजातील पदाधिकारी, समाजबांधव, किराणा व्यापारी, विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच शहरातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अंत्ययात्रेतही व्यापारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत स्व. लटूरिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बद्रीनारायण जगन्नाथ लटूरिया यांच्या निधनाने मालेगावच्या व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि सन्माननीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यापारी व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *