जळगाव जामोदमध्ये दिवसाढवळ्या ९० हजारांची रोकड व बँकांची चेकबुके लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव जामोदमध्ये दिवसाढवळ्या ९० हजारांची रोकड व बँकांची चेकबुके लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद शहरातील बालाजी मंदिराजवळ असलेल्या बालाजी ट्रेडिंग या धान्य व्यापाराच्या दुकानातून दिवसाढवळ्या ९० हजार रुपयांची रोकड आणि चार बँकांची आठ चेकबुके अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अंतर्गत कायमी गुन्हा क्र. ४९५/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास माणिकराम माटे (वय ४५) हे धान्य व्यापारी असून त्यांचे बालाजी मंदिराजवळ बालाजी ट्रेडिंग नावाचे दुकान आहे. दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या कालावधीत त्यांनी घरातून हिरव्या रंगाच्या पिशवीत ९० हजार रुपयांची रोकड तसेच चार बँकांची आठ चेकबुके आणून दुकानातील काउंटरच्या उजव्या कोपऱ्यात ठेवली होती.याच दरम्यान, संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश केला आणि काउंटरवर ठेवलेली पिशवी चोरून नेली. पिशवीतील एकूण ९० हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची चेकबुके चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून कायमी गुन्हा क्र. ४९५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक निकम यांनी केली असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपमाला वानखडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयिताचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. व्यापाऱ्यांनी मोठ्या रकमेची रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच दुकानांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही प्रणाली कार्यरत ठेवावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *