
कुबा मस्जिद परिसरातील घाण अन् मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा ;अन्यथा कचरा थेट शिरपूर ग्रामपंचायतीत टाकणार-सलीम पिरू रेघीवाले व इतर नागरिक
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि दुर्लक्षामुळे कुबा मस्जिद गवळीपुरा ते अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंतच्या रस्त्यावर पसरलेली प्रचंड घाण, कचरा आणि मोकाट जनावरांचा सुटसुटीत वावर यामुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे जगणे असह्य झाले आहे. नमाज पठणासाठी मशिदीत जाणारे नागरिक तसेच दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलांना या तुंबलेल्या घाणीचा आणि पसरलेल्या तीव्र दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित प्रशासनाच्या या गंभीर दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सलीम पिरू रेघीवाले यांच्यासह अनेक रहिवाशांनी ग्रामपंचायत प्रशासना विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांना थेट इशारा देत दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, येत्या २ दिवसांत रस्त्यावरील सर्व घाण व कचरा साफ करून रस्ता रिकामा करण्यात यावा, अन्यथा हा सर्व कचरा व मोकाट जनावरे थेट ग्रामपंचायत आवारात आणून टाकली जातील! प्रशासनाने तात्काळ जागे होऊन या समस्येवर कडक कारवाई करावी आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती दक्षता घ्यावी, अशी तीव्र मागणी आता शिरपूरवासीयांकडून केली जात आहे.या निवेदनावर सलीम पिरू रेघीवाले, शाहीर कलीम रेघीवाले, शे. आसिफ शे. अफसर, शकील हसन रेघीवाले, हुसेन गौरवे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात देऊन प्रशासनाला अंतिम इशारा देण्यात आला आहे.
