ऑनलाईन पास गुणपत्रिकेत नापास एलएलबी विद्यार्थ्याची कुलगुरूंकडे न्यायासाठी धाव

ऑनलाईन ‘पास’, गुणपत्रिकेत ‘नापास’!
एलएलबी विद्यार्थ्याची कुलगुरूंकडे न्यायासाठी धावभारतीय साक्ष अधिनियम विषयाच्या निकालातील विसंगतीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांचे निवेदन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : एल.एल.बी. द्वितीय वर्षाच्या भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ या विषयात विद्यापीठाच्या ऑनलाईन निकालात ‘उत्तीर्ण’ तर अधिकृत गुणपत्रिकेत ‘अनुत्तीर्ण’ दाखविल्याच्या गंभीर विसंगतीमुळे विद्यार्थ्याला मानसिक, शैक्षणिक व सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत मलकापूर शिवसेना तालुका प्रमुख तथा विधी शाखेचे विद्यार्थी विजय साठे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
विजय साठे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एल.एल.बी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला तेव्हा भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ या विषयात त्यांना ‘PASS’ दाखविण्यात आले होते. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील निकालावर विश्वास ठेवून त्यांनी पुढील शैक्षणिक नियोजनही सुरू केले. मात्र, त्यानंतर प्राप्त झालेल्या अधिकृत गुणपत्रिकेत त्याच विषयात ‘FAIL’ नमूद करण्यात आल्याने एकाच परीक्षेसंदर्भात दोन परस्परविरोधी निकाल समोर आल्याचा दावा त्यांनी केला आहे.ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विद्यापीठाकडे नियमानुसार लेखी तक्रार करून निकालाची पडताळणी व दुरुस्तीची मागणी केली. तसेच महाविद्यालयामार्फतही पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे मानसिक तणाव, सामाजिक अडचणी आणि शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असून पुढील शैक्षणिक वाटचालीवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कायद्याचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाकडूनच निकालासारख्या संवेदनशील प्रक्रियेत अशी विसंगती होणे ही चिंताजनक बाब असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करून ऑनलाईन निकाल व गुणपत्रिकेतील विसंगतीचे कारण स्पष्ट करावे, जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, वास्तविक निकाल जाहीर करून आवश्यक असल्यास सुधारित गुणपत्रिका द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रणालीत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी विजय साठे यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या निवेदनासोबत ऑनलाईन निकालाची प्रत, अधिकृत गुणपत्रिका, यापूर्वी विद्यापीठाकडे सादर केलेल्या तक्रारीची प्रत व प्राप्ती तसेच महाविद्यालयाने पाठविलेल्या पत्राची प्रत जोडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *