
मोरखेड शिवारातील सिंगल फेज वीजपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी; स्वाभिमानीचे आंदोलनाचा इशारा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर, प्रतिनिधी : मौजे मोरखेड शिवारातील शेतकरी व शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या समस्यांचा विचार करून सध्या रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दिला जाणारा सिंगल फेज वीजपुरवठा संध्याकाळी 6 ते सकाळी 3 वाजेपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत अंधाराचा सामना करावा लागत असल्याने तसेच शेतीसह दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याने वीजपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी सांगितले की, मोरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे तालुकाध्यक्ष गोपाल सातव, प्रविण नाफडे, पराग खर्चे, संजय चोपडे, गणेश नाफडे, कुणाल नाफडे, दिलीप नाफडे, गीतेश नाफडे, मयूर नाफडे, संजय नाफडे, विलास चोपडे, निखील नाफडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
