
गोठ्याला आग; तीन बैलांचा होरपळून मृत्यू
वाशीम जिल्हा प्रतिनिधी: (अनिल जाधव)
तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे १५ जून रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीत शेतकºयाच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत तीन बैलांचा होरपळून मृत्यू झाला असून एक बैल गंभीर जखमी झाला आहे. तसेच शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने ६ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार डोंगरकिन्ही येथील गट क्रमांक ३२० मधील शेतकरी निलकंठराव वामनराव देशमुख यांच्या गोठ्याला दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयामुळे अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यातील तीन बैलांचा मृत्यू झाला. तर एक बैल गंभीर जखमी झाला. या आगीत स्प्रिंकलर संच, ठिबक सिंचन संच, पेट्रोल पंप, अँगल, शेतीची विविध अवजारे, दहा ट्रॉली कुटार, ७० टिन पत्रे तसेच दहा ट्रॉली शेणखत आदी शेतीउपयोगी साहित्य आगीच्याभक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठे नुकसान टाळता आले नाही. दरम्यान, मालेगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन दुपारी २ वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मंडळ अधिकारी इंगळे, बी.टी. जमादार, तलाठी महेश देशमुख, डॉ. कोल्हाळ, ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सेवाराम आडे, सुनील देशमुख आदी उपस्थित होते. आग विझविण्यासाठी दत्तराव देशमुख, अनु देशमुख, गजानन गवई, सुनील देशमुख, प्रदीप गवई, किसन घाटेकर, बाळू देशमुख, आकाश देशमुख, प्रल्हाद देशमुख, प्रशासक वसंता आडे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. पीडित शेतकºयाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
