
३.५० लाख रुपयाचा शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बनवलापाणंद रस्ता
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)
शिरपूर येथील बऱ्याच शेतकऱ्यांची माणका रस्त्या लगत शेती आहे. मात्र रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनेतून पांणंद रस्ता दुरुस्त होऊ शकला नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी तब्बल ३.५० लाख रुपये खर्चून स्वखर्चाने हा रस्ता तयार केला. प्रत्येकच गावात शेतकऱ्यांची योग्य रस्त्या अभावी मोठी अवहेलना होत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते.

पेरणी, पिक काढणी यावेळेस तर शेतकऱ्यांना अधिकच त्रास होतो. पाणंद रस्त्यासाठी मोठा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम होत असल्याचे दिसत नाही. वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास आजही सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात सुद्धा पहावयास मिळतो. परिणामता त्रस्त शेतकऱ्यांनी एक बैठक घेऊन स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले. त्यानुसार एकांबा रस्ता लगतच्या मुंजा पासून ते शेषराव खत्री यांच्या शेतापर्यंत दीड किलोमीटरचा रस्ता परिसरातील शेतकऱ्यांनी ढबर, मुरूम टाकून दुरुस्त केला. यासाठी त्यांनी एकरी शेतीचा नियम ठेवून त्यानुसार ३.५० लाख रुपये जमा केले. त्यातून या रस्त्याचे काम पूर्ण केले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत मध्ये एक ठराव सुद्धा घेण्यात येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देण्यात आला होता. तरीसुद्धा हे काम होऊ शकले नाही. अखेर शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला. या रस्ता दुरुस्तीसाठी जमील रेगीवाले २५ शेतकऱ्यांनी दुरुस्तीसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले.
