सलाम_खाकीला भररस्त्यात सापडलेले लाखांचे सोने पोलिसांनी केले परत

सलाम_खाकीला भररस्त्यात सापडलेले लाखांचे सोने पोलिसांनी केले परत

वाशिम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)

कपाळावर घामाच्या धारा, अंगात खाकी वर्दी आणि कर्तव्य निभावताना मनामध्ये असलेली जनसेवेची ओढ… वाशिम शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार अशपाक भिका बेनिवाले यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे एका कुटुंबाचा आनंद कायम राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या गर्दीत हरवलेली सोन्याच्या दागिन्यांची पर्स मूळ मालकापर्यंत सुखरूप पोहोचवून त्यांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहाणाय’ या ब्रीदवाक्याचा खऱ्या अर्थाने प्रत्यय दिला.१४ एप्रिल रोजी वाशिम शहरात जयंती उत्सवाचा उत्साह शिगेला होता. मिरवणुकीच्या गर्दीत वारा जहांगीर येथील रहिवासी सौ. रेखा प्रल्हाद चव्हाण या आपल्या पतीसह दुचाकीने जात होत्या. मच्छी मार्केट समोरील रस्त्यावर त्यांच्या हातातील पर्स अनवधानाने खाली पडली. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस अंमलदार अशपाक बेनिवाले यांनी ही घटना पाहिली. त्यांनी आरडाओरडा करून महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीत त्यांचा आवाज पोहोचला नाही.ती पडलेली पर्स एका दुचाकीस्वाराने उचलून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र बेनिवाले यांनी विलक्षण चपळाई आणि सतर्कता दाखवून त्या व्यक्तीला थांबवले आणि पर्स आपल्या ताब्यात घेतली. १५ मिनिटांनंतर रेखा चव्हाण या व्याकुळ होऊन आपली पर्स शोधत पुन्हा त्या ठिकाणी आल्या. बेनिवाले यांनी सन्मानाने त्यांची विचारपूस केली. पर्स उघडली असता, त्यात सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे एक तोळा सोन्याचे मणके सुखरूप होते.या प्रामाणिकपणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी अशपाक बेनिवाले यांना कार्यालयात बोलावून त्यांचा शाल, श्रीफळ आणि ५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन सत्कार केला. ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्देमाल संबंधित महिलेला सुपूर्द करण्यात आला.गर्दीच्या आणि धावपळीच्या या युगात पोलीस कर्मचारी केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच राखत नाहीत, तर ते समाजाचे रक्षक आणि संवेदनशील मित्रही आहेत, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *