
समृद्धीवर अडकलेल्या प्रवाशांना मेडशी पोलीस चौकीचा दिलासा पोलीस कर्मचाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन; ३० प्रवाशांची सुरक्षित सुटका
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
रायपूरकडे निघालेली एक खाजगी बस समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २५३ येथे अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात देत मेडशी येथील पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा परिचय दिला.
दिनांक २५ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुमारे ३० प्रवासी पोलिसांच्या मदतीने सुरक्षितरित्या त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहेत.
हाती आलेल्या वृत्तानुसार , पुणे येथून रायपूरकडे निघालेली एक खाजगी बस समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २५३ येथे अचानक नादुरुस्त झाली. रात्री साधारण २ वाजल्यापासून ही बस महामार्गावरच उभी होती. बसमधील प्रवाशांनी संबंधित बस कंपनीशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, सकाळी प्रवाशांनी डायल ११२ या आपत्कालीन सेवेला संपर्क साधला. संबंधित घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकीचे जमादार निलेश अहिर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत मेडशी चे पत्रकार सोयल पठाण हे देखील उपस्थित होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तातडीने प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व नाश्त्याची व्यवस्था केली.
यामध्ये महिला, लहान मुले व इतर प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. त्यानंतर दुसऱ्या खाजगी बसची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना नागपूरकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले आहे.
अचानक आलेल्या संकटाच्या वेळी पोलीस विभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. या मदतीबद्दल सर्व प्रवाशांनी मेडशी पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. या घटनेमुळे पोलीस दलातील मानवतेची भावना अधोरेखित झाली आहे.
