१२ वर्षांच्या खंडानंतर शिरपूरचे गोपाल वाढे प्रथम श्रेणीत वकील प्रतिकूलतेवर मात करत मिळवला वकिलीचा बहुमान

जिद्दीला सलाम! १२ वर्षांच्या खंडानंतर शिरपूरचे गोपाल वाढे ‘प्रथम श्रेणीत’ वकील; प्रतिकूलतेवर मात करत मिळवला वकिलीचा बहुमान

जिल्हा प्रतिनिधी वाशिम (उमेश लहाने)

माणसामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि चिकाटी असेल, तर वयाचे किंवा परिस्थितीचे कोणतेही बंधन आडवे येत नाही, हे शिरपूर येथील गोपाल ज्ञानबा वाढे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरची परिस्थिती बेताची असताना आणि तब्बल १२ वर्षांचा शैक्षणिक खंड असूनही, गोपाल वाढे यांनी पहिल्याच प्रयत्नात एल.एल.बी. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. इतकेच नव्हे तर, ‘ऑल इंडिया बार एक्झाम’ यशस्वीपणे पूर्ण करून वकिलीची सनद मिळवत त्यांनी शिरपूर भागातून अनुसूचित जातीच्या समाजातील पहिले वकील होण्याचा बहुमान पटकावला आहे.*वडिलांचा वारसा आणि संघर्षाची शिदोरी*गोपाल वाढे यांचा हा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. घरी शेती नसतानाही, त्यांचे वडील ज्ञानबा वाढे यांनी आपला पिढीजात बूट-चप्पल बनविण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा हाकला. अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नात त्यांनी आपल्या तीन मुलींची लग्ने लावून दिली आणि मुलगा गोपाल याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या या कष्टाची जाणीव ठेवूनच गोपाल यांनी आज हे यश संपादन केले आहे.*पत्रकार ते वकील: अन्यायाविरुद्धचा लढा*शिक्षण पूर्ण झाल्यावर गोपाल यांनी सुरुवातीला खासगी शिकवणी वर्ग आणि स्वतःचे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र चालवले. सोबतच पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गोरगरीब आणि सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. निर्भीड पत्रकारितेमुळे अनेक प्रस्थापित लोकांशी त्यांचे वैचारिक मतभेद झाले, तरीही ते डगमगले नाहीत. याच काळात सामान्यांना कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः वकील होणे गरजेचे आहे, अशी जाणीव त्यांना झाली.*१२ वर्षांनंतर पुन्हा हाती धरले पुस्तक*कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना अभ्यासात पडलेला १२ वर्षांचा मोठा खंड भरून काढणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, २०२२ मध्ये त्यांनी एल.एल.बी. ला प्रवेश घेतला आणि २०२५ मध्ये हे शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात प्रथम श्रेणी मिळवून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली. बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आता ते अधिकृतपणे न्यायालयात वकिली करण्यासाठी सज्ज झाले आहेत.”सामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हेच ध्येयआपल्या यशाबद्दल बोलताना ॲड. गोपाल वाढे म्हणाले की, “मी केवळ पदवी मिळवण्यासाठी वकील झालो नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा ही माझी तळमळ आहे. पत्रकारितेने मला प्रश्न मांडायला शिकवले, आता वकिलीच्या माध्यमातून मी ते प्रश्न सोडवणार आहे. कुणावरही अन्याय होत असेल तर मी त्यांच्यासाठी सदैव तत्पर असेन.”त्यांच्या या यशाबद्दल शिरपूरसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *