शिवजयंतीनिमित्त माऊली कॉलेजमध्ये भव्य व उत्साहपूर्ण सोहळा संपन्न

शिवजयंतीनिमित्त माऊली कॉलेजमध्ये भव्य व उत्साहपूर्ण सोहळा संपन्न

वाशिम जिल्हाप्रतिनिधी उमेश लहाने

वाशिम : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माऊली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वाशिम येथे भव्य शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि उत्साह ओसंडून वाहत होता.कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशा व लेझीम पथकाच्या गजरात भव्य रॅलीने करण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. त्यानंतर छत्रपतींचा पारंपरिक पद्धतीने राजाभिषेक सोहळा साजरा करण्यात आला व महारती घेण्यात आली.या सोहळ्याचे उद्घाटन मा. आमदार अमितभाऊ झनक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र लक्ष्मणराव बुंधे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित प्रभावी नाट्यप्रयोग सादर केले. शिवराज्याभिषेक, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि मावळ्यांच्या शौर्यकथा या प्रसंगांचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.उद्घाटकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा व इतिहास जपण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, नेतृत्वगुण व राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श घेऊन जीवनात प्रामाणिकपणे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्षांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व राष्ट्राभिमान विकसित होतो, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *