लग्नाचा बस्ता घेण्या पूर्वीच बापाने आवळला मृत्यूचा फास

लग्नाचा बस्ता घेण्या पूर्वीच बापाने आवळला मृत्यूचा फास

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

लेकीच्या लग्नाचा बस्ता बांधायचा म्हणजे ग्रामीण भागात केवळ खरेदी नसते, तर तो संपूर्ण भाऊकीचा आणि नात्यांचा सन्मान असतो. नवीन सोयरे धायरे, नवरी-नवरदेव आणि व्याही-विहीण यांच्यासाठी कपडे खरेदी करताना सर्व भाऊकीला सोबत घेऊन त्यांचा मान-पान राखण्याची तयारी सुरू होती. लग्नाची निमंत्रणेही जवळपास सर्वांना देऊन झाली होती. मात्र, ज्या हातांनी कालपर्यंत मोठ्या आस्थेने घराघरात जाऊन अक्षता दिल्या, त्याच हातांनी २१ फेब्रुवारी रोजी मृत्यूला कवटाळल्याची सुन्न करणारीघटना मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे घडली. राजु हरिभाऊ कालापाड (वय ४०) असे मृतकाचे नाव आहे.राजु कालापाड यांची मुलगी पूनम हिचे लग्न १४ मार्च २०२६ रोजी निश्चित झाले. लग्नाची वेळ जवळ आल्याने राजु यांनी जवळपास सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींना लग्नाची निमंत्रणे (पत्रिका) देऊन झाली होती. ग्रामीण परंपरेनुसार, लग्नापूर्वी दागिने आणि कपड्यांच्या खरेदीसाठी (बस्ता बांधण्यासाठी) जवळच्या नातेवाईकांना आणि संपूर्ण भाऊकीला एकत्र घेऊन जायचे होते. या खरेदीत सर्वांचे मतघेतले जाते आणि सर्वांनायथोचित मान दिला जातो. याच परंपरेचे पालन करण्यासाठी राजु यांनी २० फेब्रुवारीच्यापूर्वसंध्येला गावातील भाऊकीत दारोदारी जाऊन सर्वांना विनंती केली होती. ‘उद्या आपल्याला लेकीच्या लग्नाचे कपडे आणि दागिने घ्यायला जायचे आहे, सर्वांनी सोबत या,’ असे सांगून त्यांनी मोठ्या आनंदाने सर्वांना आमंत्रण दिले होते. ज्या घरी आज लग्नाच्या खरेदीची चर्चा आणि लगबग होणार होती, तिथे सकाळी आक्रोश पाहायला मिळाला. शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सुमारास राजु यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. ज्यांच्याकडे जाऊन खरेदीचे निमंत्रण दिले आणि ज्यांना लग्नाची पत्रिका दिली होती, त्याच नातेवाईकांना राजु यांच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र यावे लागले. नियतीच्या या क्रूर खेळामुळे संपूर्ण पांगरी गावावर शोककळा पसरली आहे.मोलमजुरीचा आधार आणि आर्थिक विवंचनाराजु कालापाड यांच्याकडे जेमतेम दोन एकर वडिलोपार्जित जमीन होती. दोन भावांच्या वाटणीनंतर हातात आलेल्या अत्यल्प भूभागावर संसाराचा सुन करणारी ती शेवटची भेट… “भाऊ, पत्रिका तर पोहचलीच आहे, आता उद्या खरेदीलाही नक्की चला,’ असे म्हणणाऱ्या राजु यांच्या शब्दांनी काल नातेवाईकांचे मन भरून आले होते. पण ते शब्द त्यांचे शेवटचे ठरतील, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. लग्नमंडपात बापाची सावली असण्याऐवजी आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्याने उपस्थित प्रत्येक डोळा पाणावला होता. गाडा ओढणे कठीण असल्याने, राजु शेतीसोबतच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. लेकीचे लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आणि परंपरेनुसार नातेवाईकांचा मान-पान राखण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तजविजीच्च्या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी उषा, दोन मुले पवन व अक्षर आणि मुलगी पूनम असा मोठा परिवार पोरका झाला आहे.मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. एका कर्तव्यदक्ष पित्याने व्यवहाराच्या आणि परंपरेच्या ओझ्याखाली दबून आपले आयुष्य संपवल्याने शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *