
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध; शेगाव पोलिसांची तातडीची कारवाई यशस्वी
शेगाव तालुका प्रतिनिधी गजानन ददगाळ
शेगाव :शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात शेगाव पोलिसांना यश आले असून तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.३ जानेवारी रोजी मुलगी हरवल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार नोंद होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग देण्यात आला. तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी मुलीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली.या कारवाईत ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश गाडगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल राणा ओढे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुलगी हैदराबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विशेष पथक पाठवून तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शेगाव पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयित कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
