राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद

राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद

जावेद शहा सहसंपादक

नमस्कार, महाकारूणी तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विश्वरत्न भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि समस्त महापुरुषांना वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय/ सन्माननीय, तसेच प्रमुख पाहुणे, मान.कार्यक्रमाच्या आयोजिका उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या करुणा तेलंग मॅडम उपस्थित सर्व बंधू आणि भघिनींनो ,आज मी आपल्यासमोर राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या तिनही महापुरुषांच्या कार्यावर मनोगत व्यक्त करणार आहे. इतिहासाच्या पानांवर काही व्यक्ती अशा असतात ज्या केवळ आपल्या काळातच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरतात. त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या अशाच दोन तेजस्वी दीपस्तंभ आणि प्रेरणास्थान आहेत.प्रथम आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या कार्याबद्दल बोलूया. जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या एका महान राष्ट्रनिर्मात्या होत्या. बालशिवबाला त्यांनी रामायण, महाभारत, वीरकथा यांद्वारे स्वराज्याची स्वप्ने दाखवली. अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे संस्कार, धर्मनिष्ठा, स्वाभिमान आणि नेतृत्वगुण त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये रुजवले. म्हणूनच जिजाऊंना ‘राष्ट्रमाता’ असे गौरविले जाते. त्यांच्या संस्कारातूनच हिंदवी स्वराज्याचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जिजाऊंचा प्रभाव अतुलनीय होता. त्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची भावना, जनतेला न्याय, आणि जनतेबद्दल आपुलकी,जिव्हाळा, कर्तव्यभावना रुजवली.जिजाऊ मासाहेब स्वतः शूर, कणखर आणि दूरदृष्टीच्या होत्या. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली.त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची संधी कमी होती, परंतु जिजाऊ मासाहेब यांनी मातृत्वाची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांनी आपल्या पुत्राला एक उत्तम माणूस, आदर्श राजा आणि लोककल्याणकारी नेतृत्वकर्ता बनवले.म्हणूनच आपण त्यांना “राष्ट्रमाता” म्हणतो. कारण जिजाऊ मासाहेब नसत्या, तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज घडले नसते आणि स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात उतरली नसती.आजच्या काळातही जिजाऊ मासाहेब आपल्याला संस्कार, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण देतात. प्रत्येक आईने जिजाऊ मासाहेबांप्रमाणे आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार करावेत आणि प्रत्येकाने शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रासाठी जगण्याचा संकल्प करावा, हीच खरी जिजाऊंना आदरांजली ठरेल.“जिजाऊ माता अमर रहें!छत्रपती शिवाजी महाराज की जय!जय भवानी! जय शिवराय!”यानंतर आपण पाहूया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ज्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध होता, त्या काळात त्या दांपत्यांनी, भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. समाजाकडून अपमान, उपहास, शेण,दगडधोंडे सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा दिवा कधीच विझू दिला नाही. उच्चवर्णीय स्त्रिया, तसेच दलित, वंचित यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. शिक्षण हाच खरा समाजपरिवर्तनाचा मार्ग आहे, हे त्यांनी स्वकर्तृत्वातून आणि कृतीतून सिद्ध केले.मित्रांनो, बंधू आणि भघिनींनो जिजाऊंनी स्वराज्य घडवणारा राजा घडवला, तर क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी नवसमाज घडवणारी शिक्षणक्रांती घडवली.भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्रीशिक्षणाच्या जनक आणि समाजसुधारणेची तेजस्वी ज्योत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेयांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे तर दूरच, शाळेच्या उंबरठ्यावरही जाण्याची परवानगी नव्हती. अशा अंधश्रद्धा, अन्याय आणि रूढीपरंपरांनी भरलेल्या समाजात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शाळेत जाताना समाजातील काही लोक त्यांच्यावर शेण, माती, दगड फेकत असत; पण तरीही त्या डगमगल्या नाहीत. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही, हा ठाम विश्वास त्यांच्याकडे होता.सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्रीशिक्षणासाठीच नव्हे तर विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी अनाथ बालकांसाठी आश्रम काढले आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य केले. एका विधवेच्या मुलाला दत्त घेऊन पालन पोषण केले आणि त्याला डॉक्टर बनविले त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले.१८९७ साली प्लेगच्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांचे निधन झाले. पण त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत.मित्रांनो, बंधू-बगिनींनो सावित्रीबाई फुले म्हणजे धैर्य, त्याग आणि शिक्षणाची क्रांती. आज आपण शिक्षण घेत आहोत, प्रगती करत आहोत, यामागे त्यांच्या संघर्षाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांवर चालणे, काळाची गरज आहे.स्वामी विवेकानंद यांच्यावर भाषणमी आपल्यासमोर भारताच्या अध्यात्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्याविषयी काही विचार मांडणार आहे.स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. लहानपणापासूनच ते बुद्धिमान, निर्भय आणि जिज्ञासू होते. पुढे ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली.१८९३ साली अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण आजही जगप्रसिद्ध आहे. “माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो” या शब्दांनी त्यांनी संपूर्ण सभागृह जिंकले. त्या भाषणातून त्यांनी भारताची सहिष्णुता, मानवता आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जगासमोर मांडली.स्वामी विवेकानंदांचा संदेश स्पष्ट होता—“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.”ते युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी तरुणांना आत्मविश्वास, कर्तृत्व आणि देशसेवेचा मार्ग दाखवला. त्यांच्यामते, बलवान शरीर, तेजस्वी मन आणि पवित्र चरित्र असलेला तरुणच देशाचे भविष्य घडवू शकतो.स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना करून शिक्षण, सेवा आणि मानवकल्याणाचे महान कार्य सुरू केले. गरीब, दुःखी आणि पीडितांची सेवा करणे हेच खरे ईश्वरपूजन आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.आजच्या काळातही स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत मार्गदर्शक आहेत. आत्मविश्वास, परिश्रम, चारित्र्य आणि राष्ट्रभक्ती हे गुण अंगीकारले तर आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो.शेवटी एवढेच म्हणेन की,स्वामी विवेकानंद हे केवळ संत नव्हते, तर ते भारताच्या नवचैतन्याचे शिल्पकार होते.त्यांचे विचार आत्मसात करून आपण सर्वांनी एक सशक्त, सुसंस्कृत आणि समर्थ भारत घडवण्यासाठी प्रयत्न करूया. एकीने तलवारीला दिशा दिली, तर दुसरीने लेखणीला बळ दिले. स्वामी विवेकानंद यांनी युवकांना प्रेरणा दिली.या तिघांचे कार्य आपल्याला स्त्रीशक्तीची आणि देशसेवेची खरी ओळख करून देते.आजच्या काळात आपण या महापुरुषांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक न्याय, हक्कासाठी कार्य केले पाहिजे. त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवणे होय.शेवटी मी माझे भाषण या शब्दांनी संपवतो“जिजाऊंचे संस्कार आणि सावित्रीबाईंचे विचार,आणि स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणा हाच नवभारताचा खरा आधार आहे.”धन्यवाद! 🙏 आयोजकांचे खूप खूप आभार 🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *