
कचरा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा जुना रस्ता बंद; तातडीने हस्तक्षेपाची मागणी
जळगाव जामोद (जि. बुलढाणा)
जळगाव जामोद नगर परिषदेकडून सार्वजनिक शेतरस्त्यावर उभारण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून वापरात असलेला जुना रस्ता अडथळाग्रस्त झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात मोझे वायाळ शिवरातील सर्व शेतकरी व शेतमजूरांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.निवेदन नुसार, हनुमान मंदिर ते दत्त मंदिर, उकसकरी गावापर्यंत जाणारा हा जुना रस्ता वर्षानुवर्षे वापरात आहे. मात्र नगर परिषदेकडून कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करताना हा रस्ता मोकळा न ठेवता त्याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचविण्यात आले आहेत. कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असून प्लास्टिक, काच, सडलेला कचरा यामुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत आहे.पावसाळ्यात कचऱ्यातील घाण पाण्यात मिसळून शेतात जात असल्याने पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच डास, माशा, साप यांचा उपद्रव वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी विजेचा पुरवठा खंडित होत असल्याने शेतात जाणे अधिकच त्रासदायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापन प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा किंवा संरक्षण भिंत व गेट उभारून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व स्वच्छ रस्ता तातडीने खुला करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकरी यांना पाठ विनायत आला आहे
