
मलकापुरात बिबट्याची चाहूल; शेतकऱ्यांमध्ये भीती, पण संयमाचे आवाहन वनविभाग–पोलीस यंत्रणा सतर्क; शिवसेना तालुका प्रमुख विजय साठेंच्या पुढाकाराने समन्वय.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : तालुक्यातील दुधलगाव, वाघोळा चिंचोल व म्हैसवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभाग व पोलिसांनी तत्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे व संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दुधलगाव, वाघोळा चिंचोल व म्हैसवाडी या गावांच्या शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची चाहूल लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या रब्बी हंगामासाठी गहू, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी सुरू असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे अनेक शेतकरी रात्री तर सोडाच, दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत या बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही किंवा शेतीचे कोणतेही नुकसान केलेले नाही. तरी देखील अचानक दिसणाऱ्या वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली आहे. ही बाब परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांच्या निदर्शनास आणून दिली.
विजय साठे यांनी तात्काळ पुढाकार घेत वन विभाग व पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी शिरसाठ, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पेंदोर यांच्यासह पथकाने परिसरात पाहणी व शोधमोहीम राबवली. मात्र बिबट्या प्रत्यक्ष आढळून आला नाही. तो दाट झाडी व झुडपात लपलेला असावा, असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.या वेळी शेतकऱ्यांना घाबरून न जाता सावध राहण्याचे, तसेच बिबट्याला कोणतीही हानी न पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. वनविभागाच्या वतीने या प्रकरणात लवकरच योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असा दिलासाही देण्यात आला. याबाबत बोलताना विजय साठे यांनी सांगितले की, शेतकरी हा मुळातच प्राणी मित्र आहे. बिबट्याला हानी पोहोचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र बिबट्याकडून हानी होईल, ही जी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे, ती दूर करणे गरजेचे असून त्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना व्हायला हव्यात.
वनविभागाचे अधिकारी शिरसाठ यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत बिबट्याच्या वर्तनाबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पेंदोर यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून प्रशासन पूर्णतः सतर्क असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी हित आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये योग्य तो समतोल राखत निर्णय घेतले जातील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
