शेकापूर ZP शाळेत शिक्षकाचा नशेत गोंधळ; गाणं-नाचाचा व्हिडिओ व्हायरल

शेकापूर ZP शाळेत शिक्षकाचा नशेत गोंधळ; गाणं-नाचाचा व्हिडिओ व्हायरल

जावेद शहा नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने दारूच्या नशेत वर्गात मुलांसमोर गाणे म्हणत नाच केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.सदर शिक्षकाविरुद्ध पूर्वीही दारूच्या नशेत शाळेत उपस्थित राहण्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करण्यात येत असून शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान, मजूर-शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरणाबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.“शाळा म्हणजे मुलांच्या भविष्यासाठीचा पाया असताना शिक्षकाकडूनच होत असलेली अशा प्रकारची वर्तणूक अत्यंत गंभीर आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकावर तात्काळ निलंबनासह विभागीय चौकशीची मागणी जोर धरत आहे. तसेच, यापूर्वी आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व पालकांकडून होत आहे.शिक्षण ही पवित्र सेवा असून अशा घटनांमुळे एकूणच ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *