
चिखलीत अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापलेला पती पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
सततच्या कौटुंबिक वादातून आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून नवरा-बायकोतील भांडण विकोपाला गेल्याने चिखली शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या वादातून युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी उशिरा घडली. सुदैवाने पत्नी नमिता काकडे यांनी वेळेवर प्रसंगावधान राखत पेटलेली साडी पाण्याने भिजवून आपला जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान, एका महिलेचा फोन आल्याने विशाल यांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी पत्नीला बेडरूममध्ये नेऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र नमिताने हुशारीने प्रतिक्रिया देत साडीवरील आग विझवली आणि थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.या घटनेनंतर चिखली पोलिसांनी आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. तपास चिखली शहर पोलिसांकडून सुरू आहे.
या धक्कादायक घटनेमुळे चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून घटनेच्या पुढील चौकशीची सर्वत्र उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
