
रोटी ते कालवड इजिमा ५४ रस्ता डांबरीकरण करण्यात यावे – मनविसेची मागणी
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
नांदुरा: तालुक्यातील रोटी ते भोटा, हिंगणा भोटा तसेच शेगाव तालुक्यातील कालवड इजिमा ५४ रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी दिनांक २१मे २५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले.सदर रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली आहेत, तरीही रस्ता अद्यापही पुर्णत्वास गेला नाही .वारंवार अधिकारी, लोकप्रतिनिधींनी फक्त चाॅकलेटच दिले आहेत. सदर रस्ता तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असुनही सदर रस्त्याचे अद्यापही डांबरीकरण करण्यात आले नाही हे विशेष. सदर रस्ता डांबरीकरण करण्याची मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर येथे उपोषण देखील केले होते. लेखी आश्वासन मिळाल्याने सदर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर रोटी ते भोटा दरम्यान ०१ ते १.५ किलोमीटरवर अर्धवट परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने सदर रस्ता सुस्थितीत नाही . तसेच दिनांक ११ आॅक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील सदर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने चाॅकलेट वाटप आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा देखील लेखी आश्वासन नंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु आज दिनांक २१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बुलडाणा येथे कार्यकारी अभियंता यांना सदर रस्ता प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये समाविष्ट करुन सदर रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदन देते वेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे, आदी उपस्थित होते.
