
जिजाऊ ज्ञान मंदिरात छत्रपती संभाजी महाराज जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
शा.प्र.दि 14 मे. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. कॉलेज पळसखेड भट रायपूर मध्ये आज स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट होते तर प्रमुख अतिथी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचे पालक होते. सर्वप्रथम उपस्थित सर्वांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात प्राचार्य किशोर सिरसाट म्हणाले की, संभाजी महाराजांच्या सारखा अजेय योद्धा दुसरा झाला नाही. छत्रपती शिवरायांकडुन मिळालेले बाळकडू व राष्ट्रमाता जिजाऊ यांची शिकवण प्रत्यक्ष अंमलात आणणारे दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज होय. वयाच्या तेराव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ निर्मिती करणारे प्रकांड पंडित व सातसतक, नाईकाभेद नखशिखांत सारखे ग्रंथ निर्मिती करणारे संभाजी महाराज होते. अठरा पगढ भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. बलदंड शरीरयष्टी व मृत्युला ही थरकाप सुटेल असे व्यक्तिमत्व.. उत्तम प्रशासक, १३ वर्षात एकही लढाई न हरणाला धुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे. तसेच आज इयत्ता 10वी मध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या निकालासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. शिक्षणात सातत्य, तसेच डिजिटल माध्यमातून शिक्षण, पालकांचा विश्वास व विद्यार्थ्यांवर शाळा घेत असलेली मेहनत याचा आज चीज झाल्याचं समाधान आहे. हीच गुणवत्ता पुढील वाटचालीत कायम राहो या शुभेच्छा! तसेच पालकांनी असे सहकार्य असू द्या. निश्चित भविष्य काळ आपला असेल असे म्हणाले.सत्कार समारंभासाठी संस्था अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भुसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र गायकवाड यांनी केले.
