
चोहोट्टा बाजार येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी,महर्षींच्या विचारांना अभिवादन
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त आकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे जयंती उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थितांनी महर्षींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला वंदन केले.महर्षी वाल्मिकी यांना संस्कृत साहित्यातील आदिकवी म्हणून ओळखले जाते. त्यांनी रचलेल्या रामायण या महाकाव्याने भारतीय संस्कृती, साहित्य आणि समाजजीवनावर अमिट छाप उमटवली आहे.सत्य,सदाचार,कर्तव्यनिष्ठा,त्याग आणि मानवतेचा संदेश रामायणातून दिला जातो. महर्षी वाल्मिकी यांचे जीवन आणि साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे.चोहोट्टा बाजार येथे आयोजित जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे व मूर्तीचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संदेश दिला.समाजामध्ये बंधुभाव,एकता आणि समानतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला नैतिक मूल्यांची शिकवण दिली. त्यांच्या विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे,तसेच त्यांच्या कार्याची ओळख समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करून देणे, ही काळाची गरज आहे. चोहोट्टा बाजार येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन करून कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
