
अकोला पोलीस दलाची विश्वासू साथीदार श्वान ‘लुसी’चे निधन ९ वर्षांच्या सेवेत अमली पदार्थ शोधकार्यात मोलाचे योगदान, ३ किलो ६५८ ग्रॅम गांजा शोधण्यात बजावली होती महत्त्वपूर्ण भूमिका,पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून श्रद्धांजली
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोला जिल्हा पोलीस दलातील अमली पदार्थ शोधक पथकाची विश्वासू आणि कर्तव्यदक्ष सदस्य असलेल्या श्वान ‘लुसी’चे निधन झाले. तिच्या निधनामुळे अकोला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.लुसीच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव करत पोलीस दलाच्या वतीने तिला शासकीय इतमामात शोक सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी लुसीला श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) संतोष ताले आणि राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके यांची उपस्थिती होती.श्वान ‘लुसी’ने आपल्या नऊ वर्षांच्या सेवाकाळात अमली पदार्थ शोधकार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.तीक्ष्ण घ्राणशक्ती आणि विशेष प्रशिक्षणाच्या बळावर तिने अनेक प्रकरणांच्या तपासात पोलिसांना मोलाची मदत केली.अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध साठा उघडकीस आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये तिने आपली कार्यक्षमता सिद्ध केली होती.सन २०२१ मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये लुसीने उल्लेखनीय कामगिरी केली होती.उपलब्ध नोंदीनुसार,मे ते डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध प्रकरणांमध्ये एकूण ३ किलो ६५८ ग्रॅम गांजा शोधून काढण्याच्या कार्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.तिच्या या कामगिरीमुळे अमली पदार्थविरोधी कारवायांना मोठे सहकार्य लाभले.लुसी ही केवळ प्रशिक्षित श्वान नव्हती, तर पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांची विश्वासू साथीदार होती.निष्ठा,शिस्त,तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेल्या लुसीने आपल्या कार्यातून पोलीस दलाच्या सेवेत मोलाची भर घातली.लुसीच्या सेवेत तिचे प्रभारी जीपीएसआय आनंद गायकवाड,तसेच हँडलर म्हणून गोपाल चव्हाण आणि भरत ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली लुसीने अमली पदार्थ शोधकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली.लुसीच्या निधनाने अकोला जिल्हा पोलीस दलाने आपली एक निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष साथीदार गमावली आहे.तिच्या स्मरणीय सेवेबद्दल पोलीस दलाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कर्तव्यनिष्ठ सेवा,अतूट निष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी लुसीचे योगदान अकोला जिल्हा पोलीस दलाच्या स्मरणात कायम राहील.
