
आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक; वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट वीधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार मा. श्री. प्रकाश पाटील भारसाकळे यांनी अकोट शहरातील महावितरण विभागीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कार्यकारी अभियंता श्री. कुटे साहेब, उपअभियंते तसेच सर्व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.सध्या मतदारसंघात कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके वाचविण्यासाठी सिंचनाची आवश्यकता आहे. मात्र, शेतीसाठी होणारा वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. तसेच, शेतातील विद्युत रोहित्रांवर (ट्रान्सफॉर्मर) वारंवार अतिरिक्त भार येऊन ते जळण्याच्या घटना घडत आहेत. जळालेले रोहित्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.या समस्यांची गंभीर दखल घेत आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. जळालेले विद्युत रोहित्र दोन दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच मतदारसंघातील शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी रोहित्र उपलब्ध करून देण्यासह वीजपुरवठ्याशी संबंधित इतर समस्यांवरही तातडीने कार्यवाही करण्यात येईल आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन आमदार महोदयांना दिले.शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांच्या पिकांना सिंचनासाठी वेळेवर वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी या बैठकीत मांडली.
