
तालुक्यात नवदुर्गा उत्सवाचा शुभारंभ तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 121 मंडळांकडून देवीची स्थापना शहरांसह ग्रामीण भागातही भक्तिमय वातावरण
नवरात्रोत्सवाचा उत्साह
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यात नवदुर्गा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मालेगाव, जऊळका रेल्वे आणि शिरपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध नवदुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. शहरांसह ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवा निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरात 22, तर ग्रामीण भागात 35 नवदुर्गा उत्सव मंडळांनी देवीची स्थापना केली आहे. त्यामुळे मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 57 मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.
जऊळका रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. जऊळका रेल्वे गावात तीन, राजा किन्ही गावात तीन, तर इतर ग्रामीण भागात 20 नवदुर्गा उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तींची स्थापना केली आहे. या परिसरात एकूण 26 मंडळांकडून उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागातील 24, तर शिरपूर शहरातील 14 मंडळांनी देवीची स्थापना केली आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील 18 गावांमध्ये ‘एक गाव, एक नवदुर्गा उत्सव मंडळ’ या उपक्रमांतर्गतही उत्सव साजरा केला जात आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 38 मंडळे नवरात्रोत्सवात सहभागी झाली आहेत.
तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 121 मंडळे
मालेगाव, जऊळका रेल्वे आणि शिरपूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण 121 नवदुर्गा उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तींची स्थापना केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पुढील दिवसांत विविध मंडळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत नवरात्रोत्सवामुळे उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
