
मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर! अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण कायम; ओबीसींच्या १२ आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या ४२ जागांसाठी सोडत
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि. १० : मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार दीपक पुंडे यांनी ही प्रक्रिया पार पाडली.यापूर्वी ८ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही प्रवर्गांचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यावेळच्या सोडतीत केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण प्रवर्गातील जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.नागरिकांचा मागास प्रवर्गातील एकूण १२ जागा, तर सर्वसाधारण प्रवर्गातील ४२ जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये महिला आरक्षणाचाही समावेश आहे.या आरक्षण सोडतीकडे तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले होते. तहसील कार्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेस तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींमधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सरपंचपदाच्या आरक्षणामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
