राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी

बुलढाणा, दि. 7 ऑक्टोबर : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिर्डी येथे दिनांक 8 व 9 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशन, प्रशिक्षण शिबिर व चर्मकार समाज मेळाव्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे यांनी केले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशभरातील चर्मकार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व संघटनात्मक विकासाबाबत मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच विविध विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय समाजातील तरुणांना रोजगार, व्यवसाय, शासकीय योजना व सामाजिक सक्षमीकरण याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.ज्ञानदेव इंगळे यांनी सांगितले की, चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेले हे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असून बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने तन, मन आणि धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे. जिल्ह्यातून विक्रमी संख्येने उपस्थिती नोंदवून संघटनेची ताकद दाखवावी, असेही त्यांनी आवाहन केले.शिर्डी येथे होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनामुळे समाजातील विविध प्रश्नांवर विचारमंथन होणार असून आगामी काळातील संघटनात्मक दिशा निश्चित करण्यातही या मेळाव्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *