
बहापूरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण तापले; दोषी सरपंच-सचिवांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
मलकापूर दिनेश आसटकार प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील बहापूरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषी सरपंच व सचिव यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी हरिवर्धन नानाराव इंगळे (रा. बहापूरा) यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्त झाला असून त्यामध्ये सरपंच व सचिव दोषी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, चौकशी अहवालानंतरही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच, सरपंच सौ. पल्लवी देविदास चव्हाण, सचिव गजानन पांडुरंग इंगळे व सौ. शुभांगी रविंद्र वानखेडे यांना पदावरून बडतर्फ करण्यासह शासनाची फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या वापरासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यासंदर्भात यापूर्वी 1 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती कार्यालय, मलकापूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार मलकापूर तसेच पोलीस निरीक्षक मलकापूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
