
नांदुरा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र चौकशीची मागणी
नांदुरा :(संदेश पहुरकर )
नांदुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR क्रमांक ६१२ संदर्भात कायदेशीर प्रक्रिया व प्राथमिक पडताळणी योग्य पद्धतीने करण्यात आली का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे.तक्रारीनुसार, संबंधित प्रकरणात BNS कलम ३०८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, FIR नोंदविण्यापूर्वी तक्रारीतील आरोप, उपलब्ध कागदपत्रे व प्रथमदर्शनी पुरावे यांची आवश्यक पडताळणी का करण्यात आली नाही.FIR नोंदविण्याची प्रक्रिया, त्यामागील आधारभूत कागदपत्रे, स्टेशन डायरीतील नोंदी, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन किंवा आदेश यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर, अधिकाराचा गैरवापर किंवा कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास, संबंधित नियमांनुसार विभागीय व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रभावापासून स्वतंत्र ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निष्पक्षपणे करण्यात यावी आणि चौकशीचा अहवाल तक्रारदारास लेखी स्वरूपात देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
