संस्कार, आरोग्य आणि समर्पणाचा संगम: अकोटच्या विद्यांचल शाळेत ‘ग्रँड पेरेंट्स डे’ उत्साहात साजरा

संस्कार, आरोग्य आणि समर्पणाचा संगम: अकोटच्या विद्यांचल शाळेत ‘ग्रँड पेरेंट्स डे’ उत्साहात साजरा

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट येथील विद्यांचल द स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत भावुक आणि गरिमामय वातावरणात ‘ग्रँड पेरेंट्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. पिढ्यांमधील प्रेमाचे बंध अधिक घट्ट करणे आणि मुलांना कुटुंबात आजी-आजोबांचे अमूल्य स्थान व महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाच्या मागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आदरणीय आजी-आजोबांच्या शुभहस्ते माता सरस्वतीचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.सूत्रसंचालनाची जबाबदारी वैष्णवी ढोले आणि सरला पुंडकर यांनी आपल्या प्रभावी शैलीत उत्तमरीत्या पार पाडली.समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या मनमोहक सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकून घेतली.मार्गदर्शक रोहित नलोडे आणि ममता सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी रंगतदार नृत्य सादर केले, तर मार्गदर्शक अभिजीत वंडाळे, गौरव सुरतने आणि मंजिरी नेरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी सुमधुर गीते गाऊन संपूर्ण वातावरण संगीतमय करून सोडले.यासोबतच, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेत डॉ.रोहित व्यवहारे यांनी या वयात स्वतःला निरोगी आणि उत्साही कसे ठेवावे, याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच डॉ.कृष्णन बजाज,डॉ.निकिता बजाज आणि डॉ. सचिन वानखडे यांनी सर्व आजी-आजोबांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले होते.कार्यक्रमादरम्यान भारतीय संस्कृतीने नटलेल्या आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने आपल्या आजी-आजोबांचे पाय धुऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि अतूट नात्याचे प्रतीक म्हणून त्यांना प्रत्येकी एक रोपटे भेट म्हणून देण्यात आले.कार्यक्रमात उत्साह आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी ‘हाउसी’ (तंबोला) खेळाचे मजेशीर आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सर्व आजी-आजोबांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.धनश्री बन्ने आणि पायल हिंदोचा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षिकांनी हा सोहळा भव्य आणि यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *