पोलिस चौकीची दुरवस्था नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस चौकीची दुरवस्था नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नांदुरा : प्रतिनिधी – संदेश पहुरकर

नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलिस यंत्रणेच्या चौकीचीच अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील संबंधित पोलिस चौकीच्या परिसरात अस्वच्छता, साचलेले सांडपाणी, कचऱ्याचे ढीग, वाढलेले गवत तसेच मोडकळीस आलेले प्रवेशद्वार यामुळे चौकीच्या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
चौकीच्या अगदी समोरच सांडपाणी साचले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा जमा झालेला दिसून येतो. त्यामुळे दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. चौकीच्या परिसरातील स्वच्छता आणि देखभालीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, ‘पोलिस चौकी’ अशी ओळख असलेल्या ठिकाणाचीच अशी अवस्था असेल तर परिसरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, असा सवाल उपस्थित होत आहे. चौकीचे प्रवेशद्वारही जीर्ण झाले असून परिसरातील अस्वच्छतेमुळे पोलिस कर्मचारी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
पोलिस चौकी ही नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देणारी महत्त्वाची जागा आहे. त्यामुळे परिसराची नियमित स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन, चौकीची रंगरंगोटी व आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संबंधित प्रशासनाने या दुरवस्थेची तातडीने दखल घेऊन पोलिस चौकी परिसराचा कायापालट करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *