सेवा, संस्कार आणि युवाशक्ती’वर रंगला वक्तृत्वाचा जागर; वंशिका ठाकरे विभागात प्रथम सुवर्णदिव्या शिंगोळे द्वितीय, उज्वला फुले तृतीय

सेवा, संस्कार आणि युवाशक्ती’वर रंगला वक्तृत्वाचा जागर; वंशिका ठाकरे विभागात प्रथम सुवर्णदिव्या शिंगोळे द्वितीय, उज्वला फुले तृतीय

चंद्रपूर : तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या अनुषंगाने आभासी पद्धतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) +२ नागपूर विभागाच्या वतीने ‘मेरा युवा भारत – विकसित भारताच्या दिशेने’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित ही विभाग स्तरीय स्पर्धा रविवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि दर्जेदार वातावरणात पार पडली. ‘सेवा, संस्कार आणि युवाशक्ती – विकसित भारताचा आधार’ हा स्पर्धेचा विषय होता.
स्पर्धेचे आयोजन रासेयो +२ नागपूर विभागाचे विभागीय समन्वयक प्रा. रवींद्र गुजरकर यांनी रासेयो नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक श्री. दिपेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनात केले. सहायक विभागीय समन्वयक प्रा. चंद्रशेखर गिरडे, तसेच जिल्हा समन्वयक प्रा. विवेक देशमुख (नागपूर), प्रा. भालचंद्र लोडे (चंद्रपूर), प्रा. गणेश भद्राडे (गोंदिया), प्रा. उमेश पवार (वर्धा), प्रा. विजय मेश्राम (गडचिरोली) आणि विभागातील सर्व कार्यक्रम अधिकारी यांचे स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले.
नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतून ४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून ‘विकसित भारता’बाबत सक्षम विचार मांडले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत नागपूरच्या जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्सची कु. वंशिका नरेंद्र ठाकरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. देवरी (जि. गोंदिया) येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची कु. सुवर्णदिव्या सुशांत शिंगोळे द्वितीय, तर कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथील मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाची कु. उज्वला दिगंबर फुले तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
चिमूर (जि. चंद्रपूर) येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचा रतन राजू नन्नवरे आणि खरबी (नाका, जि. भंडारा) येथील विकास कनिष्ठ महाविद्यालयाची कु. सृष्टी बुद्धपाल उके यांना प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सर्व यशस्वी विजेत्यांचे व सहभागी रासेयो स्वयंसेवकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्व यशस्वी विजेत्यांना नोव्हेंबर महिन्यात सेवाग्राम येथे आयोजित ‘राज्यस्तरीय शिबिरात’ गौरवण्यात येईल. विभागीय आभासी वक्तृत्व स्पर्धेचे संचालन प्रा. रवींद्र गुजरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. उमेश पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *