
गोगा देवाजीच्या जयघोषाने दुमदुमले आकोट; शिवसेनेतर्फे गोगा नवमी उत्सव समितीचा भव्य सत्कार छडी निशानसह भव्य मिरवणुक,भक्ती उत्साह अन सामाजिक एकतेचा जागर
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
बाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत जाहरवीर गोगाजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात गोगा नवमी पर्व अकोट शहरात पारंपरिक श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ढोल- ताश्याचा गजर, डीजेचा दणदणाट आणि आकर्षक छडी – निशानासह निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे वातावरण भक्तिमय झाले. गोगाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.बाल्मिक नगर येथून पारंपरिक पद्धतीने सुरू झालेली शोभायात्रा कालंका चौक, श्रीनिवास टॉकीज, जयस्तंभ चौक, शिवाजी चौक आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुढे गेली. विविध ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत केले. या भव्य आयोजनातून धार्मिक सद्भाव, सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. रात्री उशिरा महाआरती व महाप्रसादानंतर गोगा नवमी पर्वाची सांगता झाली.
शिवसेनेचा पुढाकार; उत्सव समितीचा गौरवपूर्ण सत्कार
गोगा नवमीच्या निमित्ताने अकोट-तेल्हारा विधानसभा शिवसेनेच्या वतीने श्रीनिवास टॉकीज परिसरात गोगा नवमी उत्सव समितीचे पदाधिकारी, बाल्मिकी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व समाजसेवक यांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी तथा पत्रकार चंचल पितांबरवाले,तालुकाध्यक्ष प्रकाश गिते,विवेक फरदळे, विक्की दीडोंकार, अमित गावत्रे, भरतराज मर्दाने प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य ३०फुटाच्या हाराने गोगा नवमीच्या छडी – निशानाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गोगाजी महाराजांचे प्रमुख सेवक (महाराज) राजेंद्र संगेले, वाल्मिकी समाज पंच कमेटीचे चौधरी नरसिंगसेठ चावरे, ज्येष्ठ कामगार नेते तथा अ. भा. स. म. युनियनचे महासचिव राधेश्याम मर्दाने यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, गोगाजी महाराजांची प्रतिमा व सन्मानचिन्ह देऊन शिवसेनेच्या कु.चंचल पितांबरवाले व प्रकाश गीते यांच्या संयुक्त हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी समाजातील मान्यवर अंगद सारवान, सुनील बेंडवाल, सुनील छपरवाल, धरम चंडालिया, देवकिसन गोहर यांचाही शिवसेना पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
सामाजिक ऐक्याचा संदेश देत शिवसेनेचे नियोजन
धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत शिवसेनेने आयोजित केलेल्या या सत्कार समारोहातून “उत्सवातून एकता, एकतेतून समाजाची ताकद” असा सकारात्मक संदेश देण्यात आला.सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न या आयोजनातून अधोरेखित झाला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरतराज मर्दाने, अमित गावत्रे, बबलू दामोदर, करण ठाकूर, निलेश गवारगुरु आदींनी विशेष परिश्रम घेतले.
