
मेरा युवा भारत, चंद्रपूरच्या वतीने युवा पडोस संसद अंतर्गत ‘नशामुक्त अभियान’ कार्यक्रम संपन्न
वरोरा : प्रतिनिधी
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत मेरा युवा भारत, चंद्रपूर यांच्या वतीने युवा पडोस संसद कार्यक्रमांतर्गत ‘नशामुक्त अभियान’ हा जनजागृतीपर कार्यक्रम २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि सक्षम, निरोगी व जबाबदार युवा पिढी घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे , प्रमुख पाहुणे तथा व्यक्ते म्हणून मोक्षदा नाईक, नीरज आत्राम, तिलक ढोबळे , धनश्री पंचभाई, रुपेश कुतरमारे आणि सुरेश राठोड उपस्थित होते. मान्यवरांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
मेरा युवा भारत, चंद्रपूर यांच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात युवकांचा सामाजिक सहभाग वाढविणे आणि व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आला. युवा पडोस संसद या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना सामाजिक प्रश्नांवर विचार मांडण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे यूथ सोशलग्राम फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समितीतर्फे आयोजित ‘नशामुक्त दिवाळी’ पोस्टर प्रदर्शन. या प्रदर्शनातून दिवाळीचा सण व्यसनमुक्त, सुरक्षित आणि आनंददायी पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली बलकी हिने केले, तर आभार प्रदर्शन स्वरांजली चौधरी हिने केले. मेरा युवा भारत, चंद्रपूर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या जनजागृतीपर उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक जबाबदारी, आरोग्यविषयक जागरूकता आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
