
प्रेसनोट
खामगाव शासकीय रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णास दुजाभावाची वागणूक? प्रकृती अस्वस्थ असताना ICU मधून जनरल वॉर्डमध्ये हलविल्याचा आरोप; चौकशीची मागणी
खामगाव : प्रतिनिधी
नांदुरा येथील रहिवासी मीना हेमराज जैस्वाल या कॅन्सरग्रस्त रुग्णावर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारादरम्यान रुग्णास दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर नसतानाही त्यांना ICU मधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रुग्णाची प्रकृती अस्वस्थ असताना त्यांना ICU मधून हलविण्याचा निर्णय कोणत्या वैद्यकीय कारणास्तव घेण्यात आला, असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मीना हेमराज जैस्वाल यांच्या केसपेपर, ICU उपचार नोंदी, डॉक्टरांचे वैद्यकीय मत तसेच ICU मधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्याच्या निर्णयाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.रुग्णाच्या जीविताशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा अथवा दुजाभाव आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
