अकोटमध्ये कावड यात्रा व पालखी मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात २७ कावड-पालख्या मार्गावर

अकोटमध्ये कावड यात्रा व पालखी मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात; २७ कावड-पालख्या मार्गावर

अकोट शहर व तालुका प्रतिनिधी : शिवा मगर मो. ९९२२८३३०६४

अकोट :अकोट शहर व तालुक्यातील धार्मिक परंपरेचा मानला जाणारा कावड यात्रा व पालखी मिरवणुकीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहर व ग्रामीण भागातून निघणाऱ्या एकूण २७ कावड व पालख्या अकोट शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.यात्रा व मिरवणूक शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी स्थानिक पोलिसांसह बाहेरील पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी बाहेरील पोलीस ठाण्यांमधून ६ पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार आणि ५४ होमगार्ड जवान दाखल झाले आहेत. त्याचबरोबर अकोट शहर पोलीस स्टेशनचे ४ अधिकारी आणि ५५ अंमलदार देखील बंदोबस्तात कार्यरत आहेत.त्यामुळे एकूण १० पोलीस अधिकारी, ९० पोलीस अंमलदार आणि ५४ होमगार्ड जवानांचा फौजफाटा कावड यात्रा व पालखी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्ग, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून वाहतूक व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिक व भाविकांनी शांतता, संयम आणि शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कावड यात्रा व पालखी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *