शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन, प्राचार्य डॉ.सुनील पांडे

शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन, प्राचार्य डॉ.सुनील पांडे

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथे इंग्रजी विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.थोर शिक्षणतज्ज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच दानसुर गोविंदसिंह किल्लेदार यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एच. पांडे होते.प्रमुख उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक इंगळे, विज्ञान शाखेचे विभागप्रमुख डॉ. संतोष पाटोळे,अंतर्गत गुणवत्ता समितीचे (IQAC) प्रमुख डॉ. उमर भाटी,तर प्रमुख वक्ते म्हणून मानवविद्या शाखेचे विभागप्रमुख डॉ. संतोष कायंदे उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ. संतोष कायंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि गोविंदसिंह किल्लेदार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आजच्या शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक-विद्यार्थी संबंधांविषयी विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध आजही अतूट असून, ते यापुढेही कायम राहतील. शिक्षणव्यवस्थेतील बदल केवळ बोलून अथवा विचार करून घडून येत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) अभ्यासक्रम हा कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि संशोधनावर भर देणारा आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थी जीवनात सत्संगती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे महत्त्व विशद करताना त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य संगत, मार्गदर्शन आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. एच. पांडे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे एकमेव प्रभावी साधन असल्याचे सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे आई-वडील आणि मुलांच्या नात्याप्रमाणेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून नवनवीन उपक्रम राबवावेत, तसेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक संधी उपलब्ध करून देत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कार्यशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.विविध उपक्रमांना स्पर्धांची जोड देण्याचे नियोजन करावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या विविध संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील प्रा. डॉ. उमर भाटी यांना पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. एस. एच. पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेत गौतम अनिल खंडेराव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच भारती श्रवण मेहरे व दिव्या नारायण मानकर यांनी द्वितीय क्रमांक, तर राजनंदिनी म. डबेराव व प्राची गजानन झसकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन तायडे इंग्रजी विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया गाडगे आणि स्नेहा धनोकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैष्णवी मेंढे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्रजी विभागातील प्रा. सुधीर डुबे, प्रा. ईशांन राणे, प्रा. आरती कैथवास, प्रा. पूजा शिवरकर , प्रा. प्रतीक्षा नाथे, प्रा. अंजली प्रधान, प्रा. अंजली सावलकर, प्रा. प्रतीक्षा मडघे प्रा. मयुरी उमक यांनी तसेच आर्ट फोरमच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीनही शाखेच्या प्राध्यापकवृंद यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महाविद्यालयातील तीनही शाखेचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *