मराठी भाषेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

मराठी भाषेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवानिवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’

वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : मराठी भाषेची समृद्ध साहित्यपरंपरा, अभिजात वैभव आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दिले.महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सप्ताहाच्या पूर्वतयारी व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत घुगे बोलत होते.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, नगरपालिका आयुक्त अभिषेक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक (गृह) किरण दांडगे, अधीक्षक सुनील घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.सप्ताहाच्या कालावधीत मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्यिक परंपरा आणि अभिजात भाषेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथप्रदर्शनी, काव्यवाचन, सामूहिक वाचन यांसह विविध साहित्यिक व भाषाविषयक उपक्रमांचे आयोजन करावे, असे घुगे यांनी सांगितले. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि संबंधित यंत्रणांच्या सहभागातून सप्ताहातील उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सप्ताहाच्या माध्यमातून मराठी भाषेची प्राचीनता, समृद्ध साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा याबाबत जनजागृती करण्यासोबतच वाचन संस्कृतीला चालना देण्यावर भर द्यावा असेही घुगे यांनी बोलताना नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *