
आशा व गटप्रवर्तकांचे मलकापूर तहसीलसमोर धरणे आंदोलन
मलकापूर प्रतिनिधी दिनेश आसटकार
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आज, 10 जुलै रोजी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रलंबित मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड आणि जिल्हा सचिव जयश्री तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. जीव धोक्यात घालूनही अल्पमोबदलाः कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिलांनी अहोरात्र काम केले. मात्र, आजही त्यांना अत्यंत तुटपुंजा व अल्प मोबदला दिला जात आहे. उन्हातान्हात 45 प्रकारची कामे: गेल्या 18 वर्षांपासून तब्बल 45

अंशांच्या कडक उन्हात, प्रतिकूल परिस्थितीत आशा वर्कर्स आरोग्याशी संबंधित 45 प्रकारची कामे चोखपणे पार पाडत आहेत. आधीच कामाचा प्रचंड ताण असताना, आता प्रशासनाकडून त्यांच्यावर निवडणूक विषयक बीएलओ आणि एसआयआर यासारखी योजनाबाह्य अतिरिक्त कामे लादली जात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना शासकीयसेवेत कायम करून त्यांना तत्काळ सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे. ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योजना लागू करावी. 23 महिन्यांपासून थकीत असलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता आणि मातृवंदना योजनेचा मोबदला त्वरित देण्यात यावा. बीएलओ आणि निवडणूक विषयक लावण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामे त्वरित बंद करण्यात यावीत. ईएसआय, ईपीएफसह दरमहा किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन देऊन महिला कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
