
वाशीम जिल्ह्याला कधी मिळणार मंत्रिपद ? शिंदेंच्या ‘भाकरी फिरविण्याच्या’ निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भावना गवळींचे नाव पुन्हा चर्चेत
वाशीम जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव
ता. १४: राज्याच्या सत्ताकेंद्रात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील काही मंत्र्यांना ‘डचू’ देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांच्या मतदारसंघात पालिका व महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी खालावली आहे, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडीत मागास वाशीम जिल्ह्याला आमदार भावना गवळी या लाडक्या बहिणीला यांच्या रूपाने संधी मिळणार का याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.राज्यात या संभाव्य बदलांच्या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात वाशीम जिल्ह्याला सध्या एकही प्रतिनिधित्व नाही. जिल्हा मागास मानला जात असताना विकासासाठी मंत्रीपदाची गरज असल्याची जनभावना दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, विधान परिषद सदस्या भावना गवळी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.मालेगाव आणि रिसोड नगर परिषदेत शिवसेनेला इतिहासात पहिल्यांदाच सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. विधानसभा निवडणुकीत अल्पमताने पराभव झाला असला तरी मतदारसंघात शिवसेनेला इतिहासात पहिल्यांदा ६० हजारांहून अधिक मते मिळाल्याचे वास्तव दुर्लक्षित करता येणार नाही, भावना गवळी यांनी वाशीम लोकसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा विजय मिळवला होता.शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सामील होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या खासदार ठरल्या होत्या. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कथित सर्वेक्षणाचा हवाला देत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी शिंदे सेनेने हिंगोली लोकसभेचे तत्कालीन खासदार तथा नांदेड निवासी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे सेनेची उमेदवारी दिली होती. या निर्णयानंतरज्ञमतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे. यानंतर भावना गवळी यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली.या काळात भावना गवळी यांनी पक्ष संघटन मजबूत केल्याने मालेगाव नगर पंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली तर रिसोड पालिकेत भाजपला सत्तास्थानी बसविण्यात आमदार भावना गवळी यांची साथ कामाला आली. आता त्यानंतर वाशीम जिल्ह्यात शिंदे सेनेचा जनाधार अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतून ‘निष्ठेला न्याय’ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, शिंदेंकडून होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात कामगिरीच्या आधारे निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. अशावेळी वाशीम सारख्या मागास जिल्ह्याला प्रतिनिधित्व देत राजकीय संदेश दिला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाशीमला मंत्रिपदाचा हक्क मिळणार का ?
वाशीम जिल्ह्यात माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते तेव्हापासून गेल्या २० वर्षांत जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. वाशीम जिल्हा मागास असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाला संधी मिळाली तर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. फेरबदलाच्या हालचालीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नवीन वाशिम जिल्हाच हा स्व पुंडलीकराव गवळी यांच्या मागणीनुसार झालेला असतांना त्यांच्या कन्या भावनाताई गवळी विधान परिषद आमदार भावनाताई गवळी या लाडक्या बहिणीला,लाडके भाऊ शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मंत्रिमंडळात समावेश करून लाडक्या बहिणीला व जिल्हाला न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे
