मलकापूर भाग ३ व कुंड खुर्द येथे विद्युत तार चोरीचा फटकाउभी पिके धोक्यात;

मलकापूर भाग ३ व कुंड खुर्द येथे विद्युत तार चोरीचा फटका उभी पिके धोक्यात; तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे : मलकापूर भाग तीन व कुंड खुर्द परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत तारा चोरी केल्याने शेतशिवारातील तसेच गावातील वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला असून त्याचा गंभीर फटका शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना बसत आहे. रब्बी हंगामातील उभी पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने विद्युत तारा जोडण्यात याव्यात, अशी ठाम मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास मलकापूर भाग ३ येथील शेतशिवारात शेतकऱ्यांच्या शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत तारा चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला असून गहू, हरभरा, ज्वारी, मका यांसारखी रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. परिणामी शेतमाल उत्पादनात घट होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर कुंड खुर्द गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत तारा देखील चोरीला गेल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित परिसरातील विद्युत पुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला असून, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.यावेळी शेतकरी व ग्रामस्थांमध्ये श्रीकृष्ण पाटील, सुहास पाटील, सुधीर नेहते, शेख समीर शेख सलीम, संदेश शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *