
अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली
जावेद शहा मलकापूर : अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली आहे. विद्यमान विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. बी. जाधव यांनी दि. 12 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार आरोपीस भा.दं.वि. कलम 376 AB व पोक्सो कायदा कलम 5 (m) व 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन वर्षांची अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.तसेच भा.दं.वि. कलम 452 अंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षांची अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने पीडित अल्पवयीन बालिकेवर घरात घुसून अत्याचार केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर पीडितेच्या आईने तत्काळ हस्तक्षेप करून मुलीची सुटका केली व पोलिसांत तक्रार दिली.पोलीस निरीक्षक आशिष गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष सत्र न्यायालयात खटल्यादरम्यान पीडिता, तिची आई व इतर साक्षीदारांसह एकूण 13 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विवेक बापट यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपी दोषी ठरविला. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
